16 दिवसांत 10 लाख करोनाबाधित

अमेरिका, ब्राझीलपेक्षाही भारतात रुग्ण वाढीचा वेग जास्त

नवी दिल्ली – देशात करोनाचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 30 लाखांवर पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरला आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली, तर अमेरिका व ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतात मागील 16 दिवसांतच 10 लाख रुग्ण आढळून आले आहेत.

ब्राझीलमध्ये करोना रुग्णांची संख्या 20 लाखांहून 30 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 23 दिवसांचा कालावधी लागला होता. तर दुसरीकडे अमेरिकेतही रुग्णसंख्या 20 लाखांहून 30 लाख होण्यासाठी 28 दिवस लागले होते. हे दोन्ही देश जगात सर्वोधिक करोना रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत आघाडीवर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, तर दुसऱ्या स्थानावर ब्राझील आहे.

दोन्ही देशांची तुलना केली, तर भारतातील रुग्णसंख्या 20 लाखांहून 30 लाखांवर पोहोचण्यासाठी फक्त 16 दिवसच लागले आहेत.

या आकडेवारीवरून भारतातील करोना रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतात रुग्णांची संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप लागला होता. 138 दिवसानंतर भारतातील रुग्णसंख्या 10 लाखांपर्यंत गेली होती. अमेरिकेत 98 दिवसांतच 10 लाख रुग्ण आढळून आले होते. तर ब्राझीलमध्ये 114 दिवसांमध्ये रुग्णसंख्या 10 लाखांवर पोहोचली होती.

10 लाख रुग्णसंख्येनंतर भारतातील रुग्णसंख्येचा वेग वाढला. 21 दिवसात रुग्णसंख्या 10 लाखांवरून 20 लाखांवर पोहोचली. दुसरीकडे अमेरिकेत 43 दिवस, तर ब्राझीलमध्ये 27 दिवसांच्या कालावधीनंतर इतके रुग्ण आढळून आले होते.

करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची तुलना केल्यास भारतात दोन्ही देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. 30 लाख रुग्णसंख्या असताना अमेरिकेत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तर ब्राझीलमध्येही 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.