अकरावीसाठी 10% वाढीव जागा

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालयात 10 टक्के जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. यामुळे 1 हजार 431 वाढीव जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धत राबविण्यात येत आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल घटला आहे. यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता लागली होती. बहुसंख्य विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातच प्रवेश हवा असतो. गेल्या वर्षी ज्या महाविद्यालयांचा दुसऱ्या फेरीत कट ऑफ 85 टक्‍क्‍यांहून अधिक होता, अशा महाविद्यालयांना कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांच्या प्रवेशासाठी 10 टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. मात्र कोणत्या महाविद्यालयाला किती वाढीव जागा मिळणार याची उत्सुकता विद्यार्थी, पालकांना लागली होती.

अखेर प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी नुकतीत वाढीव प्रवेशाच्या जागा व महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.