न्यूयॉर्क – पोलिसांच्या क्रूर कारवाईदरम्यान जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या अशांततेमध्ये अभिनव पद्धतीने आंदोलन करून आपला निषेध नोंदवला जाऊ लागला आहे. त्यामध्ये काल डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी 8 मिनिटे एक पाय गुडघ्यापर्यंत वर करून उभे राहिले होते.
फ्लॉईड याच्या मानेवर 8 मिनिटे पोलीस अधिकारी उभा राहिला होता. त्याचा निषेध या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला होता. आज देखील अशाच प्रकारे पोलिसांच्या क्रौर्याचा निषेध एका युवकाने केला. त्याची दखल घेऊन त्याला बक्षिसही दिले गेले. हे बक्षिस म्हणजे चक्क एक कार आणि शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती आहे.
अँटोनियो ग्विन जूनियरने दुसऱ्या दिवशी कामावर जाणाऱ्या लोकांसाठी रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेतला. त्याने तब्बल 10 तास रस्त्याची स्वच्छता केली. अँटोनियो हा केवळ 18 वर्षांचा युवक आहे आणि इयत्ता दहावीमध्ये शिकतो आहे. चक्क हातात झाडू घेऊन त्याने केलेल्या कामाचे वार्तांकन अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने केले आणि त्याला या कामाचे योग्य बक्षिस देण्यासाठी काही स्थानिक पुढे सरसावले.
स्थानिक रहिवाशाने त्याला एक रेड मस्टंग कन्व्हर्टेबल कार भेट दिली आणि बफेलोमधील मेडेलल कॉलेजने त्यांना संपूर्ण शिष्यवृत्तीही देऊ केली आहे.
यापूर्वी पोलिसांच्या क्रौर्याच्या निषेधार्थ निदर्शकांनी याच भागातील बेली व्हेन्यूवर मोर्चा काढला होता. या मोर्च्यावेळी मोठी तोडफोड झाली होती. रस्त्यावर पडलेल्या काचा आणि कचरा पाहिल्यानंतर, अँटोनियोने स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता.
दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी लोकांना या रस्त्याचा वापर करावा लागेल हे ठाऊक असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता. त्याच्या या कामाची दखल घेऊन 27 वर्षीय मॅट ब्लॉकने त्याला 2004 चे मॉडेल असलेली रेड मस्तंग कार बक्षीस म्हणून देण्याचे ठरविले. तर बफेलोमधील मेडाईल महाविद्यालयाने अँटोनियोला व्यवसायिक अभ्यासण्यासाठी संपूर्ण शिष्यवृत्ती दिली आहे.