खड्डे बुजविण्यासाठी 10 दिवसांचा ‘अल्टिमेटम’

अखेर दखल; येत्या दोन दिवसांत कार्यक्रम समोर ठेवा : महापौरांचे आदेश

पुणे -“खड्डे 10 दिवसांत बुजवा आणि याबाबत पुढील दोन दिवसांत कार्यक्रम आखून तो समोर ठेवा. महापौर कार्यालयाकडून ते वेळापत्रक सर्व नगरसेवकांना पाठवले जाईल,’ असे आदेश महापौर मुक्‍ता टिळक यांनी सोमवारी महापालिका मुख्यसभेत दिले.

संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी महापालिका मुख्यसभेत केली. त्यावर सदस्यांनीच नव्हे तर महापौरांनीही कडक भूमिका घेत प्रशासनाला आदेश दिले. शहरात पडलेले खड्डे दहा दिवसांच्या आत बुजवण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे तर रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार हे देखील प्रशासनाने स्पष्ट करावे, असाही आदेश महापौरांनी मुख्यसभेत दिला. या खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. जोरात पाऊस आणि खड्ड्यांमध्ये साचणारे पाणी यामुळे रस्त्यांवर, मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळापूर्व तयारीदरम्यान खड्डे बुजवण्यासाठी पाच कोटी खर्च प्रशासनाने केला आहे. असे असतानाही या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे, असे बराटे म्हणाले. यावर पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा दिला. “शहरात 1400 कि.मी.चे रस्ते आहेत. त्यातील 400 कि.मी.चे रस्ते कॉंक्रिट आणि 1 हजार कि.मी.चे रस्ते डांबरी आहेत.
नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये 100 कि.मी.चे रस्ते आहेत. 114 कि.मी. रस्त्यांवर अंडरग्राऊंड केबलिंग टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हे खड्डे बुजवण्यात आले आहेत,’ असे पावसकर यांनी सांगितले.

“खड्डे दिसल्यास महापालिकेला कळवण्याचे आवाहन केले आहे, त्यासाठी हेल्पलाइनही तयार केली आहे. पोलीस, महापालिका कर्मचारी यांचा व्हॉट्‌स ऍप ग्रुप बनवून त्यांच्यामार्फतही खड्ड्यांची माहिती घेतली जात आहे. खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे,’ असेही पावसकर म्हणाले.

मात्र, “रस्ते बनवल्यानंतर त्याचा खराब न होण्याचा कार्यकाळ पूर्ण न होताच त्या रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. त्यासाठी ठेकेदारांवर कारवाई काय करणार हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. याशिवाय महापालिकेच्या कोठीमधून येणाऱ्या मालाची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. असे चालणार नाही,’ असे महापौर म्हणाल्या. “सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत खड्डे बुजवले गेले पाहिजेत तसेच कोणत्या प्रभागात कधी काम करणार याची यादी दोन दिवसांत महापौर कार्यालयात द्यावे,’ असेही आदेश महापौरांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.