नगर जिल्ह्यात 1 हजार 623 शिक्षकांच्या बदल्या

मराठी 1 हजार 584, तर उर्दू माध्यमातील 39 शिक्षकांचा समावेश

नगर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्ह्यातील 1 हजार 623 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या असून, शनिवारी पहाटे याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली.

शिक्षकांच्या बदल्या शासन पातळीवरून ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असून जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या बदलीचे अर्ज भरण्यासाठी 6 ते 11 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले. सोमवारी दि. 17 पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत असून, तत्पूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे खुद्द शिक्षण विभागही गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. शनिवारी पहाटे शासनाने आदेश जारी केले. त्यात विशेष संवर्ग, पती-पत्नी एकत्रितकरण, बदलीपात्र शिक्षक अशा चार टप्प्यातील 1 हजार 623 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील मराठी माध्यमातील 1 हजार 584 तर उर्दू माध्यमातील 39 शिक्षकांचा समावेश आहे.

यामध्ये विशेष संवर्ग 1 मधील 280, विशेष संवर्ग 2 मधील 266, बदली अधिकार प्राप्त संवर्गातील 106 व बदली पात्र संवर्गातील 932 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत किंबहुना ते विस्थापित झाले आहेत अशा शिक्षकांच्या ऑफलाइन समुपदेशनाने बदल्या करण्याचे अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. असे जिल्ह्यात 100 शिक्षक विस्थापित झाले आहेत.

शनिवारी बदल्या झालेल्या शिक्षकांना दुपारपर्यंत आदेश बजावून तत्काळ कार्यमुक्त व नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याने सोमवारपासून सदरचे शिक्षक आपापल्या शाळेत रुजू होतील तथापि, बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी प्राप्त होताच, सोमवारी त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.