नाकाबंदी दरम्यान निगडी येथील धक्कादायक घटना
पिंपरी – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 16) निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
अनिल नामदेव चव्हाण (वय 40, रा. संस्कृती हाईटस्, शिंदेवस्ती, रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय विष्णू जाधव (वय 54) असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे निगडी वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते निगडीतील टिळक चौकात नाकाबंदी करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपी चव्हाण याच्या (एमएच-14-जीवाय-1719) या मोटारीस पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र आरोपी चव्हाण याने मोटारीची गती कमी केली नाही.
त्याला थांबण्याचा इशारा करण्यासाठी जाधव हे पुढे आले असता चव्हाण याने त्यांच्या अंगावर मोटार घातली. मोटारीसह त्यांना फरफटत नेत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आरोपी चव्हाण याची मग्रुरी थांबली नाही. “”मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझीच गाडी का अडविली? तुम्ही आमच्यावर दादागिरी करताय, तुमची गुंडशाही चालली आहे. मी लगेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलवितो, मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देत पुन्हा तो पोलिसांच्या अंगावर धावून आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
“तो’ आमचा कार्यकर्ता नाहीच – राष्ट्रवादी
पोलिसाच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा तसेच राष्ट्रवादीच्या नावाने धमकी देणारा तो अनिल चव्हाण हा आमचा कार्यकर्ता नाहीच. त्याचा राष्ट्रवादीशी दुरान्वये संबंध नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दै. “प्रभात’ शी बोलताना दिली.