बर्मिंगहॅम – इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात काल रात्रीच्या सुमारास झालेल्या एका चाकू हल्ल्यामध्ये 1 जण ठार झाला आणि 7 जण जखमी झाले. पोलिसांनी आज ही माहिती दिली. हा चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत.
हा हल्ला एकाच व्यक्तीने केलेला असावा. बर्मिंगहॅममधील रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटमधून बाहेर पडणऱ्या ग्राहकांवर हा हल्ला करणात आला होता. या हल्ल्यामागील नेमका हेतू अद्यापही स्पष्ट झालेला नसून त्याचीही तपासणी केली जात आहे, असे वेस्ट मिडलॅंड्स पोलिसांचे मुख्य अधीक्षक स्टीव्ह ग्राहम यांनी सांगितले.
आतापर्यंत केलेल्या चौकशीमधून हा चाकू हल्ला कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असल्याचा पुरावा उपलब्ध झालेला नसल्याचेही ग्राहम यांनी सांगितले. मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी चाकूने भोसकण्याच्या घटना घडल्याचे पोलिसांना कळवण्यात आले होते. त्यानंतर दोन तासांच्या अवधीमध्ये
शहरात अन्यत्रही अशाच प्रकारे चाकू हल्ला झाल्याचे समजले होते. या सर्व चाकू हल्ल्यांमागील सूत्रधार हल्लेखोर एकच असावा, असे गृहित धरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यत आला आहे.
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 7 पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित 5 जणांना तुलनेने किरकोळ इजा झाली आहे. या हल्ल्यांपैकी हल्ल्याची एक घटना बर्मिंगहॅमजवळच्या ‘गे व्हिलेज’मध्ये घडली होती.