कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. कोल्हापूर, सांगली भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. आरोग्यमंत्री शिंदे बुधवारपासून कोल्हापूर मुक्कामी आहेत.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या कामात सहकार्य करतानाच त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत देखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती आहे. तेथील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेचाही आरोग्यमंत्री दैनंदिन आढावा घेत आहेत. राज्यभरात 325 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
पुराच्या पाण्यामुळे होणारा लेप्टोचा संभाव्य धोका ओळखून त्याच्यावरील उपचाराच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सिसायक्लिन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे. पूरग्रस्त भागात पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.