नेवासा -शेअर्स कंपनीत गुंतवणूक केल्याचे गाजर दाखवून शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके याने शिक्षकांनाच खोटी माहिती देवून दर महिन्याला गुंतवणूकपोटी लाखाला 20 हजार रुपये मिळत असल्यामुळे 10 हजार रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना व दहा हजार रुपये आम्हाला ठेवणार असल्याची बतावणी करुन शिक्षकाकडूनच शिक्षकांना 1 कोटी 79 लाख रुपयाला गंडा घातल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राज्यभरात शिक्षकांची फसवणूक करुन सुमारे 500 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ज्ञानार्जन करणाऱ्या गुरुंनीच गुरुवर विद्या उलटावून आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानत हा मोठा आर्थिक घोटाळा केला. यामध्ये अनेक रथीमहारथी सहभागी असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. फसवणूक करणारी मंडळी जिल्ह्यातून गुल झाली आहे.
दरम्यान, दर महिन्याला केवळ 10 हजार रुपये जादा मिळणार असल्याच्या ऐवजी दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवत पारनेर येथील एका शिक्षक टोळीने आपला पसारा जिल्ह्यासह राज्यात पसरावून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून शिक्षकांसह इतरांना गंडा घातल्याची फिर्याद नेवासा पोलिस ठाण्यात दाखल झाली.
भानसहिवरा येथील प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी तक्रार दाखल केली. गुंतवणूक केलेली रक्कम मला दामदुप्पट करून देतो म्हणून सन ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 या दरम्यान पारनेर तालुक्यातील वैभव अनंत चेमटे, अनंत दत्तात्रय चेमटे, भूषण अनंत चेमटे सर्व (रा. भाळवणी ता. पारनेर), बाळासाहेब दगडू सालके, भाऊसाहेब सदाशिव सालके (रा.काळकूप ता. पारनेर), नीलेश भाऊसाहेब शिंदे (रा.टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर) यांनी 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
हा मोठा आर्थिक घोटाळा असल्याने संबंधित आरोपींच्या बाबतीत आवश्यक तो तपास व माहिती काढण्याचे काम चालू आहे. आणखी ज्या- ज्या तक्रारी येतील त्याबाबत गुन्हा नोंदवून तपास कार्य सुरू राहील. तांत्रिकबाबींची माहिती घेत आहे.
– बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
दरम्यान या प्रकरणी मोठी साखळीच बाहेर येण्याची शक्यता आहे. दामदुप्पट अमिषाला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक तसेच नोकरदार व्यक्तींसह बड्या रथी- महारथींचा समावेश असून फसवणूक झाल्याची चर्चा प्राथमिक चर्चा आहे. केवळ बोभाटा नको म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची स्थिती फसल्या गेलेल्यांची झाली आहे.