संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उत्तर प्रदेश मधील दोघांवर गुन्हा
संगमनेर : कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी शिवारातील खांजापूर परिसरातील एका व्यापार्याची तब्बल 1 कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, 25 जानेवारी पर्यंत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे मनोहर दगडू सातपुते (वय-38, (रा. खांजापूर, सुकेवाडी शिवार) यांच्या कडून 1 कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांच्या रक्कमेचा कांद्याचा माल खरेदी करून अमन राजपूत आणि मनमोहन राजपूत (रा. ललई, पोस्ट खैरगड, जिल्हा फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) या दोघांना ट्रान्सपोर्टने पाठविला होता.
मालाचे पैसे घेण्यासाठी सातपुते यांनी व्यापार्यांना वारंवार फोन केला असता त्यांनी फोन बंद करून ठेवल्याचे लक्षात आले. आरोपी यांनी सातपुते यांना कोरा चेक दिला. मात्र तो चेक बंद खात्याचा असल्याचे समजल्यावर त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अमन राजपूत आणि मनमोहन राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी हे तपास करत आहेत.