पिंपरी – जमीन देतो, असे सांगत एका ठगाने पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली. प्रफुल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. के. शब्बीरबाबू अबुबकर किझाक्कुम (वय 40, रा. औंध) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जून 2017 ते 8 ऑक्टोबर 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली. फिर्यादी रेचे यांनी आरोपी किझाक्कुम याला जमीन विकत घेण्यासाठी 19 लाख रुपये दिले. मात्र आरोपीने ती जमिन रेचे यांना न देता परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विकली.
अशाच प्रकारे आरोपीने नानासाहेब पंडित जेवे यांच्याकडून 14 लाख रुपये, प्रकाश व्यंकोबा बिडवाई यांच्याकडून 23 लाख 61 हजार, अमरनाथ विभूते यांच्याकडून 12 लाख 50 हजार रुपये, तरबेज शिंगरे यांच्याकडून 33 लाख 35 हजार 600 रुपये घेतले. अशाप्रकारे आरोपीने पाच जणांनी एक कोटी दोन लाख 46 हजार 600 रुपयांची फसवणूक केली.