पुणे – खडकवासला मतदारसंघातून 9 उमेदवारांनी एकूण 15 अर्ज भरले होते. शनिवारी (दि. 5) झालेल्या अर्ज छाननीमध्ये शिवसेनेकडून रमेश कोंडे यांनी भरलेला अर्ज बाद झाला. परंतू, त्यांनी अपक्ष उमेदवारीचाही अर्ज भरल्यामुळे तो वैध ठरला आहे. त्यामुळे सध्या 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महायुतीकडून भीमराव तापकीर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सचिन दोडके, बहुजन समाज पार्टीकडून अरूण गायकवाड, वंचित बहुजन आघडीतर्फे आप्पा आखाडे, बहुज मुक्ती पार्टीकडून ऍड. राहुल बागडे तर दीपक बलाडे, बाळू प्रताप आणि डॉ. सोमनाथ पोळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले असून, या सगळ्यांचे अर्ज वैध झाले आहेत.
रमेश कोंडे यांनी सुरवातीला शिवसेनेकडून अर्ज भरला, तर दुसऱ्या दिवशी अपक्षचा अर्जही भरला होता. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म न जोडल्यामुळे छाननीमध्ये कोंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असला, तरी अपक्ष भरलेला अर्ज वैध आहे. त्यामध्ये रमेश कोंडे उमेदवारी अर्ज माघार घेणार का? पक्षाकडून त्यांना काय आदेश येतोय आणि त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.