संयुक्त राष्ट्र – ज्या देशाचे नागरिक परदेशात मोठ्या संख्येने राहतात अशा देशांची जी यादी तयार करण्यात आली आहे, त्यात भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. संयुक्त राष्ट्राने नुकतीच यासंदर्भात एक यादी जाहीर केली आहे. त्यानुसार 2020 परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या 18 मिलीयन अर्थात 1 कोटी 80 लाख असल्याचे सांगण्यात आले आहे.
संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि सौदी अरबमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक विषयांशी संबंधित विभागाच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय लोकसंख्येचे पलायन हा अत्यंत वेगळा विषय आहे.
त्याबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो आहे. आज जगातील अनेक देशांमध्ये भारतीयांचे वास्तव्य आहे. भारतानंतर मेक्सिको आणि रशिया यांचा क्रमांक लागतो या दोन्ही देशांचे प्रत्येकी 1.1 कोटी लोक परदेशांत राहतात. त्यानंतर चीनचे 1 कोटी तर सीरियाचे 80 लाख नागरिक परदेशात वास्तव्याला आहेत.
भारताचे संयुक्त अरब अमीरातीत 35 लाख, अमेरिकेत 27 लाख, सौदी अरबमध्ये 25 लाख लोक राहतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुवेत, ओमान, पाकिस्तान, कतार आणि ब्रिटन या देशांतही भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे.
अहवालातील म्हणण्यानुसार 2000 या वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. केवळ मोजक्याच देशांत नाही, तर जगातील बहुतेक देशांत गेलेल्या भारतीयांची संख्या वाढली आहे.