नवी दिल्ली – देशाच्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांची राष्ट्रीय पातळीवर नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने ई श्रम नावाचे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर एका महिन्यात 1 कोटी 71 लाख कामगारांनी नोंदणी केली आहे.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांसाठी हे रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात आले असून त्यात नोंदणी करणाऱ्या कामगारांना विविध सामाजिक योजनांचा लाभ दिला जाणार आहे. 26 ऑगस्ट रोजी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून आज त्याला एक महिना पुर्ण झाला.
या महिना भराच्या अवधीत एकूण 1 कोटी 71 लाख 59 हजार 743 कामगारांनी त्यावर नोंद केली आहे. या नोंदणी करणाऱ्या कामगारांमध्ये महिला कामगारांची संख्य 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मोलकरणीच्या स्वरूपाचे काम करणाऱ्या महिलांनी यात नोंदणी करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
16 ते 59 वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना यात नोंद करण्याची अनुमती आहे. यात शेत मजुर, मनरेगा मजुर, दूध व्यवसायातील मजुर, आशा वर्कर्स, अंगणावाडी कर्मचारी, रस्त्यावरील फेरीवाले, घरकाम करणारे मजुर, रिक्षा ओढणारे चालक, आणि अन्य क्षेत्रातील मजुरांना नोंदणी करण्याची अनुमती दिली गेली आहे.