गायींसाठी मिळणार दीड लाख कर्ज

माजी मंत्री शिवाजी कर्डिले : नगर जिल्हा बॅंकेची प्रस्तावाला मंजुरी

नगर – जिल्हा सहकारी बॅकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, पक्षीपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी-मेंढी पालन या करिता खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता मंजुरी देण्यात आली. प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे 10 गायींकरिता दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे.

तरी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवांनी प्रत्येक गावातून या परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करुन कमीत कमी 50 शेतकऱ्यांचे प्रकरणे जिल्हा बॅंकेच्या शाखेकडे पाठविण्यात यावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुका विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने सेवा संस्थेच्या सचिवांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी संचालक रावसाहेब शेळके, तालुका विकास अधिकारी आनंद शेळके, शेती कर्ज मॅनेजर संजय बर्डे, आस्थापन विभागप्रमुख शैलेश बोधले, गजेंद्र क्षीरसागर, महादेव कराळे, सुनील काळे, सुनील भांड, राजेश नामदे, रामदास सोनवणे व तालुक्‍यातील सेवा संस्थेतील सचिव उपस्थित होते.

यावेळी कर्डिले म्हणाले की, करोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बॅंकेने वेगवेगळे निर्णय घेण्याचे काम केले आहे.

संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी तसेच विविध निर्णयांची माहिती शेतकऱ्यांना समजून सांगावे. मध्यम मुदत पीक कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावातून सुमारे 50 कर्ज प्रकरणे पाठवावेत. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीची हात देणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.