कर्ज हमी योजनेंतर्गत लघुउद्योगांना कर्जपुरवठा
नवी दिल्ली – शंभर टक्के आपत्कालीन कर्ज हमी योजनेंतर्गत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतील बॅंकांनी 18 ऑगस्टपर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे मंजूर केली आहेत. तीन लाख कोटींच्या कर्जासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
यापैकी 1 लाख कोटींची कर्जे याआधीच वितरित झाली आहेत. लॉकडाऊनमुळे होणारी प्रचंड हानी आटोक्यात आणण्यासाठी विविध क्षेत्रांना खासकरून लघु, सूक्ष्म व मध्यम क्षेत्रांतील उद्योगांना कर्ज पुरवणे अशी ही योजना आहे. आपत्कालीन कर्ज हमी योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी 76,044 कोटीं रुपयांची कर्जे मंजूर केली. त्यापैकी 56,483 कोटी रुपयांची कर्जे याआधीच वितरित झाली आहेत. तर खासगी क्षेत्रातील बॅंकांनी 74,715 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली, त्यापैकी 45,762 कोटी रुपयांची कर्जे याआधीच वितरित झाली आहेत.
भारतीय स्टेट बॅंक, कॅनरा बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बॅंकांनी जास्त प्रमाणात कर्ज मंजूर केली आहेत.
अपेक्षेपेक्षा हे कर्ज वितरण कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यात अर्थमंत्रालयाने काही सहकारी बॅंकांनाही लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याच्या परवानगीवर विचार सुरू केला आहे. काही राज्यांत सहकारी बॅंकांनी लघुउद्योगांना कर्ज दिले आहे. या राज्यात सहकारी बॅंकांना ही योजना लागू करता येईल. यामुळे अडचणीत असलेल्या उद्योगांना मदत होणार आहे.
शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्जपुरवठा
कोविड-19 मुळे बसलेल्या धक्क्यातून उभारी मिळावी या हेतूने किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्ड मंजूर झाली आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उभारी धरेल आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला गती येईल. आत्मनिर्भर भारत मोहिमेचाच हा एक भाग आहे. एकूण 2.5 कोटी शेतकरी, मच्छिमार आणि दुग्धउत्पादकांना याचा लाभ मिळेल.