निवडणुकीसाठी सव्वालाख कर्मचारी


पुणे – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 10 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विभागात एकूण 1 कोटी 86 लाख 18 हजार मतदार असून 19 हजार 842 मतदान केंद्रे आहेत. तर लोकसभा निवडणुकीसाठी 1 लाख 37 हजार कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकारने विभागीय आयुक्त यांची नियंत्रण अधिकारी तसेच समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीच्या कामांची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 4 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. तसेच विभागात मतदारांची संख्याही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

मतदान प्रक्रीयेत दिव्यांग व्यक्ती राहू नये, मतदान करताना त्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी-सवलती देण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तीसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मतदार संघातील मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.