दीड कोटी सातबारे उतारे नव्या स्वरुपात

नव्या पद्धतीने काम सुरू; 50 वर्षांनंतर महत्त्वपूर्ण बदल

पुणे – सातबारा उताऱ्यामध्ये सुमारे 50 वर्षानंतर बदल करण्याचे काम सुरु झाले असून आतापर्यंत सुमारे दीड कोटी सातबारा उताऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर शासनाचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावच्या नावाचा कोड असणार आहे. शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असणार आहे.

राज्यात एकूण 2 कोटी 53 लाख सातबारा उतारे आहेत. जमिनीशी संबंधित समजल्या जाणाऱ्या एक पुराव्यापैकी महत्त्वाचा पुरावा असलेला संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुण्यात बदल करण्यास जुलै महिन्यात राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार शेतकऱ्यांना नव्या स्वरूपातील सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-व्रिकी करणे आदी प्रकार घडतात. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात महसुल विभागाकडून बदल करण्यात आले आहेत.

सात म्हणजे जमिनी मालकी (भोगवटादार) असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असले क्षेत्र, तर बारा मध्ये पीकपाण्याची नोंद असते. त्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटले जाते. आता त्याच्या नमुन्यामध्ये बदल होणार असल्यामुळे तो समजण्यासाठी अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होत आहे.

असा आहे नवा सातबारा उतारा…
– सातबारामध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क.
– गावाच्या नावासोबत एलजीडी कोड (लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड.
– लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्र दर्शविले आहे.
– शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक.
– खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद करण्यात येत आहे.
– मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात येत आहे.
– बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे.
– क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्‍यकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.