1 जूनच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

राजेंद्र नागवडे यांचे आवाहन : राज्य, केंद्र सरकारची भूमिका शेतकरी विरोधी असल्याची टीका
श्रीगोंदे – राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ आश्‍वासनांची पाने पुसण्याचा कृतघ्नपणा सरकारने केला आहे. सरकारने जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे पातक केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुन्हा संप व आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपला हक्क मिळविण्यासाठी व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पक्षाभिनिवेष न बाळगता या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
यासंदर्भात नागवडे म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून आम्ही सदैव शेतकरी हिताचीच भूमिका घेतलेली आहे. शेतकरी हिताच्या लढ्यात आम्ही शेतकरी म्हणून नेहमीच आघाडीवर होतो, यापुढेही राहू. शेतकऱ्यांच्या संप व आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. राज्य व केंद्रातील सरकारे शेतकरी व सहकारविरोधी आहेत. सत्ताधाऱ्यांना शेतकरी व सामान्यांच्या समस्या सोडवायच्याच नाहीत. उलट शेतकरी व सहकार अडचणीत कसा येईल याकडे सरकारचा कल असल्याचे दिसते.
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांवर आश्‍वासनांचा पाऊस पाडणाऱ्या भाजपला सत्तेवर आल्यानंतर स्वतःच्याच जाहीरनामा व आश्‍वासनांचा विसर पडावा हे दुर्दैवी आहे. अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करून देशाला अन्नधान्य व भाजीपाला, दूध या जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारा अन्नदाता शेतकरी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशोधडीला लागला आहे. सरकार दरबारी शेतकरी व त्याच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही हे केवळ संतापजनक आहे, अशी टीका त्यांनी केली.

दीडपट हमीदराची घोषणा हवेत विरली…
मागील 15 वर्षांत देशभरातील जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला वैतागून जीवन संपविले आहे. मागील चार वर्षांत शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मात्र, सरकारला याचे सोयरसुतक नाही, अशी टीका करून नागवडे म्हणाले की, शेतीमालाला संबंधित पिकाच्या उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीदर देण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच विरले आहे. कर्जापासून मुक्‍ती आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त व वाजवी किमान भाव हा मिळालाच पाहिजे. एकीकडे शेतीमालाचे दर कोसळत असताना सरकार देशात पुरेसा उपलब्ध असलेला शेतीमाल व साखरेची आयात करीत आहे, हा सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा ठोस पुरावाच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)