शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांची उत्सुकता
राजगुरूनगर: खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ शुक्रवारी राजकीय सभांनी ढवळून निघणार आहे. या मतदारसंघावर प्रभाव असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दुपारी २ वाजता, तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ४ वाजता सभा होणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची सभा होणार आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी मार्केट, राजगुरूनगर येथे ही सभा होणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी दिली आहे.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे खेड वासियांचे लक्ष लागले आहे. तर हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यामुळे शरद पवार यांची सभा निर्णायक ठरेल का अशी चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
तर उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर, कृष्णा खोरे विकास नेते मिलिंद नार्वेकर, महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा नितीन बानगुडे, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सेना भाजप, आरपीआय यांच्यासह महायुतीचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.