चंदिगढ : हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ मनोहरलाल खट्टर हे उद्या (रविावरी) दुपारी घेणार आहेत. त्यांची शनिवारी भाजप आमदारांच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.
आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी आमचे निमंत्रण स्वीकारले आहे. मी माझ्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. उद्या दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मी राजभवनात शपथ घेईन, दुष्यंत चौताला हे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे खट्टर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने 90 सदस्यांच्या हरियाणा विधानसभेत 40 जागा पटकावल्या. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना सहा जागा कमी होत्या. जननायक जनता पक्षाने 10 जागांवर विजय मिळवला. या पक्षाच्या दुष्यंत चौताला यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. चौताला हे माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे पणतू आहेत. आपल्या पक्षाला हरियाणात स्थैर्य हवे होते म्हणून आपण भाजपासोबत आघाडी केल्याचे चौताला यांनी सांगितले.