दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरण
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी आरोपींनी वापरलेले आणि खाडीत टाकण्यात आलेल्या हत्याराचे अवशेष शोधूण्यासाठी उच्च न्यायालयाने आज सीबीआयला आणखी तीन आठवड्याची मुदतवाढ दिली. तर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या तपास अधिकार अधिकारी बदलण्याच्या याचिकेचा फेरविचार करावा, असेही न्यायालयाने पानसरे कुटूंबियांना सुचवून याचिकेची सुनावणी 15 जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.
कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर झाली.
यावेळी सीबीआयने खाडीतील हत्याराचे अवशेष शोधण्यासाठी नॉर्वेसह युरोपातील प्रशिक्षित डायव्हर्सची मदत घेतली जात आहे. मात्र ख्रिसमससाठी 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही मंडळी आपल्या मायदेशी परतणार असल्याने आणखी तीन आठवडे मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली. तर एसआयटीने तपास सुरू असून तो प्रगती पथावर असल्याचे सांगितले.
याची दखल न्यायालयाने घेत न्यायालयाने सीबीआयला आणखी तिन आठवड्याची मुदतवाढ देताना एसआयटी तपास यंत्रणेचा तपास अधिकारी बदल करण्याऱ्या अर्जाचा पुनर्विचार करावा ,असे सुचित करताना अशा प्रकारे अर्ज करणे याचिकाकर्त्यांवरच उलटू नये, अशा शब्दांत पानसरे कुटूंबियांना इशारा देत याचिकेची सुनावणी 15 जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.