प्रतिनिधी
कविता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. तारुण्यात “प्रेम कवितां’च्या प्रेमात पडला नाही असा तरुण विरळाच. अगदी स्वतःला लिहायला जमलं नाही तरी तिच्यासाठी लिहिलेल्या पत्रात कुणाच्या तरी चार-सहा काव्यपंगती लिहिण्याची उर्मी कोणालाही रोखता येत नाही. सीताराम नरके यांच्या कवितेचा चेहरामोहरा बघता त्यांनी निवृत्तीनंतर शब्दांशी संधान बांधलं असावं, असं दिसून येतं.
परंतु सीताराम नरके यांनी शब्दांची संगत घेऊन सुरू केलेला प्रवास अथकपणे सुरू ठेवला आणि त्यामुळेच “वळणावरती’ या कविता संग्रहातील त्यांच्या कवितेला वळण सापडल्याचे जाणवते. असे असतानाही “तसे तर मी कोणत्या वळणावर आहे हे मला अजून समजलेले नाही’, असं ते त्यांच्या मनोगतात प्रांजळपणे नमूद करतात; परंतु ही त्यांची नम्रता आहे. वास्तवात त्यांची कविता बऱ्यापैकी वळणावरती आलेली आहे.
जीवनावर, माणुसकीवर, सद्गुणांवर सीताराम नरके यांची नितांत निष्ठा आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये हळुवारता आहे. ती अनावश्यक शाब्दिक थयथयाट करत नाही. सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होतानाही मर्यादेच्या सीमा ओलांडत नाही. मुक्तछंद, अष्टाक्षरी, ओवी छंद, अभंग, लावणी असे विविध काव्य प्रकार हाताळण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. कल्पना, प्रतीकं यांचा सुयोग्य वापर ही त्यांच्या कवितेची ओळख सांगता येईल. सखी आणि सहचरणी अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांची कविता हिंदोळे घेते.
सारे सोडून आलीस तू
या काळजातल्या घरी
मायेने झाकली सारी
कमतरतेची दरी
अथवा-
वाळलेले लाकूड मी
त्याला पालवी फुटली
प्रेम करताना इथे
किती वादळे उठली
यासारख्या ओळींमधली सहजता आणि स्वाभाविकता मनाला भावते. परंतु कविता निव्वळ सखी आणि सहचारिणी या जीवनातील दोन प्रमुख व्यक्तिरेखांभोवतीच त्यांची कविता घुटमळत नाही. ती सामाजिक आशय मांडू बघते. ती निसर्गात रममाण होण्याचा प्रयत्न करते.
निसर्ग या कवितेतील-
येत झुळूक वाऱ्याची
डोलू लागतात पाने
गळा भेट घेऊनिया
छान म्हणतात गाणे
या ओळींच्या माध्यमातून कवीने निसर्गाशी संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न स्त्युत्य आहे. वेदनेचा ओरखडा, ज्योतिबांचे उपकार, ओठांचे किनारे, सहजीवन, कुणीतरी असावं अशा काही उल्लेख करता येतील अशा कविता या आढळून येतात. कवयित्री प्रा. रूपाली अवचरे आणि कवी शिवाजी चाळक यांची प्रस्तावना, निखिल लंभाते यांचं सहजसुंदर मुखपृष्ठ या आणखी काही जमेच्या बाजू.
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
पाने : 80, मूल्य : 130 रुपये