थेऊर येथील कारवाईत दुकानदाराभोवती संशयाची सुई
थेऊर- हवेली तालुक्यातील थेऊर येथील स्वस्त धान्य दुकानाची शनिवार ( 18 मे ) रोजी दुपारी हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी आपल्या पथकासमवेत अचानक झाडाझडती घेत काही कागदपत्रांसह गहू धान्याची पाहणी केली. यामध्ये शासकीय गोदामातून दुकानदाराला पाठवलेला गहू व प्रत्यक्ष दुकानातील निकृष्ट गहू यामध्ये तफावत आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये संशयाची सुई संबंधित दुकानदाराभोवती फिरू लागली आहे.
महसूल नायब तहसीलदार संजय भोसले, पुरवठा निरीक्षक रवींद्र दळवी, शासकीय गोडावून व्यवस्थापक इम्रान मुलाणी, लिपीक योगेश बंगले, गोपाल गोडवे, नंदा क्षीरसागर, राजेंद्र विद्याधर, संजय टाक थेऊरच्या पोलीस पाटील रेश्मा कांबळे, मांजरी तलाठी गोकुळ भगत आदींनी पुन्हा दुकानातील कागदपत्रांची तपासणी केली. शासकीय गोडावूनमधून आलेला व दुकानातून वितरित होत असलेल्या गव्हात साम्य नसल्याने परिसरातील दुकानासह इतर पाच ते सहा दुकानांत पाठवण्यात आलेले गव्हाचे नमुने जमा करण्यात आले. परंतू नमुन्यात मेळ बसत नसल्याने दुकानातील गहू गोडावूनमधून आलेला नसल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे दुकानदारावर कारवाई होणार, हे आता निश्चित झाले आहे. मात्र, दुकानदाराने बनावट गहू कोठून गैरमार्गाने आणला? यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचाही सखोल तपास झाल्यास पाळेमुळे उघड होण्यास मदत होणार आहे.
येथील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थी ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा गहू माथी मारण्याचा प्रकार बुधवार (दि. 15) रोजी सकाळी उघडकीस आला होता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन महसूल खात्याने दुकानाची तपासणी केली. त्यांना साडेतीन पोती खराब गहू मिळून आला आहे. हा माल शासकीय गोदामातून आला असल्याचा दावा दुकानदाराने केला असला तरी दुकान व गोडावूनमधून आलेला गव्हाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे दुकानदाराकडे संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
हा गव्हाचा काळाबाजार थेऊर येथील तुकाराम भिवा अवचट यांच्या स्वस्त धान्य दुकानात घडला आहे. ग्राहक समितीचे पदाधिकारी लक्ष्मण चव्हाण यांनी पुरवठा विभागास ही बाब कळवली. याची दखल घेऊन गुरुवार (दि.16) रोजी महसूलचे नायब तहसीलदार संजय भोसले, पुरवठा निरीक्षक रवींद्र दळवी, शासकीय गोडावून व्यवस्थापक इम्रान मुलाणी, थेऊरच्या पोलीस पाटील रेश्मा कांबळे आदी पदाधिकारी तेथे पोहोचले. दुकानाची पाहणी केली असता त्यांना तेथे खराब गव्हाची साडेतीन पोती आढळून आली. तपासणीनंतर येथील दप्तर ताब्यात घेण्यात आले. परंतू पंचनामा रजिस्टर मिळून आले नाही.
- काळाबाजारावर रजिस्ट्रेशन कॅम्पचा उतारा
आज झालेल्या तपासणीवेळी अनेक लाभार्थी उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यांनी यादीतून नावे गायब होणे, वारंवार कागदपत्रे देवूनही नाव न येणे, मशीनमध्ये हातांचे ठसे न येणे, पुरवठा विभागाकडून आलेल्या यादीतून लाभार्थ्यांचे नाव अचानक गायब होणे आदी प्रकारांमुळे धान्य मिळण्यापासून वंचित राहात आहेत, आदी तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. यावर तहसीलदार कोळी यांनी लाभार्थी वंचित राहू नयेत म्हणून पर्यायी दुकानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्वांची नावे यादीत यावीत म्हणून येथील तलाठी कार्यालयात रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. - थेऊर येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून हवेलीचे तहसीलदार यांना पाहणी करण्याविषयी सांगितले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, संबंधित दुकानामध्ये दुकानमालकाने काही गैरप्रकार केला असल्यास कोणालाही पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे.