शहरात 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मान्यता
बारामती- देशाला आणि राज्याला राजकारणाचे धडे देणाऱ्या तसेच अल्पावधीतच शैक्षणिक हब म्हणून ओळख निर्माण केलेल्या राज्यात विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गुन्हेगारांवर वचक आणि बारामतीकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण शहरात 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. बारामती शहराततील नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 172 कॅमेरे बसवण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता नुकतीच मिळाली आहे. यामुळे स्वच्छ सुंदर बारामती आता सुरक्षित देखील असणार आहे.
बारामती शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नगरपरिषदेने व शहर पोलिसांनी हाती घेतला होता. त्यानुसार शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाच्या गृह विभागाच्या वतीने या प्रस्तावास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे बारामती वर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. बारामती नगरपरिषद हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जतन होऊन गुन्हे उघडकीस करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास बारामती नगरपरिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता राहण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने सीसीटीव्ही प्रस्तावाला मान्यता देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी 172 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नगरपरिषदेने पाठवलेल्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी 1 कोटी 34 लाख 30 हजार 800 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या उपक्रमास खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्या खासदार निधीतून 75 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर उर्वरित 59 लाख 30 हजार 800 रुपयांची तरतूद बारामती नगरपरिषद करणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया संबंधी पुढील कारवाई पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार होणार आहे.
- ही ठिकाणे आहेत महत्त्वाची
शहरातील भिगवन चौक, इंदापूर, गांधी, सुभाष चौक, गुणवडी चौक, पेन्सिल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, न्यायालय परिसर, एमआयडीसी परिसर, मुख्य बाजारपेठा, सिनेमा, फलटण, इंदापूर रस्ता तसेच कसबा परिसर. - बारामती नगरपरिषद व पोलीस यांच्या प्रयत्नातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला शासन दरबारी नुकतीच मान्यता मिळाली आहे, त्यामुळे शहरातील महत्त्वाचे चौक रस्ते तसेच बाजारपेठामध्ये 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या उपक्रमास शासनाच्या वतीने 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर उर्वरित जवळपास 60 लाख रुपयांची तरतूद बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
– सचिन सातव, गटनेते, बारामती नगरपरिषद