“पुणे महापौर प्लॉगेथॉन’ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद
– 19 टन प्लॅस्टिक आणि सुका कचऱ्याचे संकलन
पुणे : “पुणे हे माझे शहर आहे आणि ते मीच स्वच्छ ठेवणार’ या भावनेतून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या “पुणे महापौर प्लॉगेथॉन’ उपक्रमाच्या निमित्ताने शनिवारी पुणेकर अक्षरशः एकवटले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये पुणे शहराला अव्वल मानांकन मिळवून देण्यासाठी तब्बल 1 लाख 5 हजार 417 पुणेकर पहिल्याच प्लॉगेथॉनमध्ये धावले आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धारही केला.
या संपूर्ण मोहिमेत 18 हजार 800 किलो ( 19 टन) प्लॅस्टिक आणि सुका कचरा संकलित करण्यात आला. शहरात एकाच वेळी तब्बल 776 ठिकाणी ही मोहीम घेण्यात आली.
कोथरूड मधील कर्वेपुतळा, कोथरूड येथून करण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मोहोळ उपस्थित होते. महापौर मोहोळ यांनी ‘चला प्लॉगिंग करुया पुण्याला स्वच्छ ठेवूया’, या घोषणेने प्लॉगेथॉनची सुरवात करण्यात आली. शहरातील एकूण 98 मुख्य रस्ते, 178 उद्याने एकूण 500 मनपा-खाजगी शाळा अशा एकूण 776 ठिकाणी प्लॉगेथॉन घेण्यात आली. यामध्ये स्थानिक नगरसेवक, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गट सदस्य आणि इतर प्रतिष्ठीत सदस्य यांचा सहभाग होता. तसेच सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्यासह गटनेते आणि नगरसेवकांनी आपापल्या निवासस्थानाजवळील प्लॉगेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला.
एकूण 500 मनपा व खाजगी शाळांच्या परिसरात देखील याचप्रमाणे प्लॉगेथॉन ड्राइव्ह घेण्यात आला. यामध्ये एकूण 75 हजार 632 शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. याचबरोबर शहरातील 178 उद्यानांमध्ये देखील हास्य क्लबचे सदस्य, दैनंदिन वॉकसाठी येणारे नागरिक असे एकूण 5,610 नागरिकांनी उद्यानांमध्ये प्लॉगेथॉन ड्राइव्ह राबविला. डेक्कन नदीपात्रातील भिडे पुलाजवळ या प्लॉगेथॉनची सांगता करण्यात आली. मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वी शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य जगदीश हिरेमनी, अतिरिक्त महापालिका आयुक्त शांतनू गोयल, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यावेळी उपस्थित होत.
प्लॉगेथॉनला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय आहे, हा उपक्रम एक दिवस न राहता पुणेकर त्यात दररोज सहभागी होतील. स्वच्छ सर्वेक्षणसाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. स्वच्छतेबाबत पुणेकरांमध्ये लोकचळवळ उभी राहत आहे, याचा विशेष आनंद आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर.