- नाराज रवी लांडगे अनुपस्थित
- राष्ट्रवादीचा पराभव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ऍड. नितीन लांडगे यांची आज (शुक्रवारी) निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांचा 5 मतांनी पराभव केला. लांडगे यांना 10 तर भालेकर यांना 5 मते मिळाली. लांडगे हे स्थायी समितीचे 37 वे अध्यक्ष आहेत.
अध्यक्षपदासाठी डावललेल्या रवी लांडगे यांनी निवडणुकीला येणे टाळले.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.2) अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी भाजपकडून ऍड. नितीन लांडगे आणि राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अर्ज दाखल केला होता. स्थायीत भाजपचे 10, अपक्ष 1 असे 11 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, शिवसेना 1 असे 16 सदस्य आहेत. भाजपचे रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे. परंतू, पक्षाने मंजूर केला नसतानाही त्यांनी निवडणुकीला येणे टाळत पुन्हा आपली नाराजी पक्षाला दाखवून दिली.
महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आज सकाळी बारा वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला माघार घेण्याची विनंती केली. परंतु, राष्ट्रवादीने माघार घेण्यास नकार दिला. राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया झाली.
भाजपच्या लांडगे यांना 10 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे भालेकर यांना पाच मते मिळाली. शिवसेनेच्या मीनल यादव यांनी राष्ट्रवादीला मतदान केले. भाजपच्या लांडगे यांचा 5 मतांनी विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केले. दरम्यान, रवी लांडगे गैरहजर राहिल्याने नितीन यांचे 1 मत कमी झाले. त्यांना पक्षाचे 9 आणि अपक्ष नीता पाडाळे यांच्यासह 10 मते मिळाली.