मंचर – करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असतानाही सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल. तसेच धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दोघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शनिवारी (दि. 4) शिरूर-आंबेगाव विधानसभा या व्हॉट्सऍप ग्रुपवर एका अज्ञात व्यक्तीने व ग्रामसुरक्षा दल वडगाव या व्हॉट्सऍप ग्रुपवर एका युवकाने धार्मिक भावना दुखावतील अशाप्रकारचा मेसेज टाकून एक व्हिडीओ क्लिप वायरल केली. या व्हिडिओ क्लिपमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन समाजात तेढ निर्माण होऊ नये. यासाठी मेसेज व्हिडिओ टाकणाऱ्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.