गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई
पुणे,दि.21- सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट चारच्या पथकाकडून जेरबंद करण्यात आले. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याने 2 लाख 10 हजाराचा ऐवज चोरला आहे. हा ऐवज आणी गुन्हयात वापरलेली बुलेट ताब्यात घेण्यात आली आहे.
गजानन अर्जुन पाटील(25,रा.गवळी वाडा, वडगाव शेरी, मुळ ता.जामनेर,जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद नोंदवली होती. फिर्यादी महिला व पती दोघेही नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन घराची पहाणी केली असता कपटातील 78 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यांची किंमत 2 लाख 10 हजार इतकी होती ते चोरीला गेल्याचे आढळले. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणी उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग यांनी गुन्हयच्या ठिकाणी भेट देऊन युनिट चारच्या पथकास समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानूसार युनिट चारकडील पोलीस कर्मचारी अशोक शेलार, सागर घोरपडे, सुरेंन्द्र साबळे हे वडगाव शेरी, चंदननगर परिसरातील फिर्यादी यांच्या घराच्या परिसरातील खासगी सीसीटीव्ही फुटेजची पहाणी करत होते. त्यांनी तब्बल 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. यावेळी त्यांना सीसीटीव्हीत बुलेटवरील एक संशयीत व्यक्ती आढळला. दरम्यान तो वडगाव शेरी परिसरात फिरत असल्याची खबर मिळाली. यानंतर तांत्रीक तपासात अर्जुन पाटीलचे नाव उघड झाले. त्याच्या अटकेसाठी पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्या अधिपत्याखाली दोन पथके तयार करण्यात आली.त्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यात आले असता, त्याने गुन्हयात चोरलेले दागिने काढून दिले. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली बुलेटही जप्त करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय झांजड, पोलीस कर्मचारी अशोक शेलार, सागर घोरपडे, जितेंन्द्र तुपे, सुरेंन्द्र साबळे, सचिन ढवळे, शंकर संपते, शंकर पाटील, शितल शिंदे, अतुल मेंगे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम राकेश खुनवे, हनुमंत बोराटे यांच्या पथकाने केली.