सायबर चोराने खात्यातून परस्पर काढलेले पैसे समर्थ पोलिसांनी दिले परत मिळवून
पुणे,दि.5- सायबर चोराने एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून परस्पर काढलेले पैसे समर्थ पोलिसांनी परत मिळवून दिले. यासाठी पोलिसांकडून बॅंकेच्या व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधून प्रयत्न करण्यात आला. सायबर चोरांनी चोरलेले पैसे परत मिळत नाहीत किंवा चोर सापडले तरी पैसे परत मिळणे अवघड असल्याचा साधारणत:हा समज आहे. मात्र आपण जर एटीएम कार्ड किंवा बॅंक खात्याची कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली नसेल आणी आपल्या खात्यातून सायबर चोरांनी परस्पर पैसे काढले असतील तर ते बॅंकेकडून परत मिळू शकतात. समर्थ पोलिसांनीही हीच बाब लक्षात घेऊन तक्रारदाराकडून डिसपूट फॉर्म भरुन घेत बॅंकेकडून त्याचे 28 हजार रुपये परत मिळवून दिले.
तक्रारदार श्रिराम शिवराम देशपांडे(58,रा.रास्ता पेठ) हे सेवानिवृत्त आहेत. त्यांचे नाना पेठेतील एका खासगी बॅंकेत खाते आहे. या खात्यास आधार आणी मोबाईल क्रमांक लिंक आहे. देशपांडे 10 सप्टेंबरला घरी असताना, त्यांच्या बॅंक खात्यातून एटीएमव्दारे दोन वेळा दहा हजार आणी एकदा आठ हजार असे 28 हजार रुपये काढल्याचे संदेश आला. त्यांनी तातडीने समर्थ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार अर्ज दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) विनायक साळुंखे, पोलीस शिपाई गणेश शेंडे, सचिन गोरखे व निलेश साबळे यांनी तात्काळ तक्रारदाराला घेऊन बॅंक गाठली. तेथे त्यांच्याकडून डिसपूट फॉर्म भरुन घेतला. यानंतर पोलीस वारंवार तक्रारदार आणी बॅंकेच्या संपर्कात राहिले. पोलीस प्रकरणाचा वारंवार फॉलोअप घेत असल्याने बॅंकेने 23 दिवसांत तक्रारदाराचे पैसे परत केले. तक्रारदाराने पोलिसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.
बॅंकींग प्रक्रियेत एक लाखाच्या आतील रक्कम सायबर क्राईमध्ये बॅंक खात्यातून सायबर चोरांनी परस्पर काढल्यास तीन दिवसांत बॅंकेत डिसपूट फॉर्म भरुन द्यावा. असे केल्यास बॅंकेकडून सदरची रक्कम परत मिळू शकते. बऱ्याच नागरिकांना डिसपूट फॉर्म बद्दल माहिती नसते. यामुळे असे काही घडल्यास नागरिक थेट पोलिसांकडे धाव घेतात.