मुख्यमंत्र्यांकडून एका रात्रीत मंजुरी
शिवेंद्रसिंहराजे यांचा यशस्वी पाठपुरावा
त्रिशंकू भागासह चार ग्रामपंचायतींचा समावेश
कॉंक्रिट रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी मंजूरहद्दवाढीत पश्चिमेकडील मौजे दरे खुर्द संपूर्ण क्षेत्र यवतेश्वर किल्ल्यापर्यंत, दक्षिणेकडील मौजे गोडोलीचा पुणे-बॅंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या पश्चिमेकडील अजिंक्यतारा किल्ल्यासह,
पूर्वेकडील पुणे-बॅंगलोर राष्ट्रीय महामार्ग 4 च्या पश्चिमेकडील मौजे खेड व मौजे गोडोली, मौजे कोडोली मधील भाग व उत्तरेकडे मौजे करंजे गावाचा वेण्णा नदीपर्यंतचा संपूर्ण भागाचा समावेश हद्दवाढीत करण्यात आला आहे.
सातारा – बहुप्रतिक्षित सातारा शहराच्या हद्दवाढीला अखेरीस मंजुरी मिळाली. रविवारी रात्री महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर रात्री उशिरा हद्दवाढीला मंजुरी देण्यात आली. साताऱ्याच्या हद्दवाढीमुळे शहरातील त्रिशंकू भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्याचबरोबर हद्दवाढीमुळे शहराच्या परिसरातील पिरवाडी, गोडोली, संभाजीनगर, विलासपूर, शाहूपुरी, करंजे परिसराचा नगरपालिका क्षेत्रात समावेश होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांमुळे प्रलंबित राहिलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हद्दवाढीच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सातारा येथे रविवारी (दि. 15) झालेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत शिवेंद्रसिंहराजे यांनी शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न निवडणुकीपूर्वी मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी पुन्हा केली. त्यांनी मागणी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. यावरच न थांबता त्यांनी रात्री नगरविकास खात्याला तसे आदेश दिल्याने हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.
हद्दवाढीमध्ये करंजे विभागांतर्गत गडकर आळी गावठाणासह स.नं. 1 ते 82 अ,ब,क,ड व 87 भाग, 88 ते 89, 90 भाग ते 169, 171, 173 भाग, 186 ते 187,188 ते 270 भाग तसेच 322 भाग, 323 भाग, 324 भाग, 327 भाग, 328 भाग, 334 भाग, 343 भाग, 344, 345, 346, 347, 348, 349, 353, 354, 355, 358, 359 ते 367, 368, 369, 370 ते 410, 411, 416 भाग, 417 (स.नं.367 मध्ये सामील, 419, 420, 421(स.नं.367 मध्ये सामील), 429 भाग, 430, 432 भाग आदींचा समावेश आहे. तसेच खेड विभागांतर्गत पिरवाडी गावठाणासह स.नं 1 ते 3, 4 भाग, 5 ते 8 व 9 भाग, 12,13 भाग, 15, 16 खेड – स.नं 82 भाग, 83 भाग, 84 भाग, 97 भाग, 99 अ,ब, 100 भाग, 101, 102, 106 ते 110, 111 भाग, 128 आणि मौजे दरे (खुर्द) गावठाणासह स.नं 1 ते 88, मौजे कोडोलीअंतर्गत स.नं 290 ते 295 आणि 297 ते 299 व मौजे गोडोलीअंतर्गत स.नं 1 ते 13, 16,19 ते 20, 23 भाग, 24 ते 35, 36 भाग, 39 ते 41, 46, 49 अ, 40 ब, 50 अ, ब ते 51, 52 अ,ब ते 75 अ,ब,क 76 ते 152,154 ते 170, 171 अ,ब,क, 172, 190 अ,ब, 191 अ, ब आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील स.नं 45,50 ते 51 भाग, 58 भाग आदींचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूरसारघ्या शहरांमध्ये सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते होतात, मग साताऱ्यात का नाही, असा सवाल करत शिवेंद्रराजे यांनी साताऱ्यातील रस्ते कॉंक्रिटचे करण्यासाठीही आचारसंहितेपूर्वी निधी देण्याची मागणी केली. तीदेखील मुख्यमंत्र्यांनी मान्य करून 50 कोटी रुपयांचा निधी जाहीर केले. हे दोन्ही प्रश्न मार्गी लागल्याने सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नगरविकास विभागाकडून या प्रस्तावाबाबत हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही त्रुटींमुळे हा प्रस्ताव प्रलंबितच राहिला होता. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रश्न तडीस नेण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुंबईत अधिवेशनामध्येही त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत निवेदन दिले होते.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आता महाजनादेश यात्रेनिमीत्त साताऱ्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या सभेत शिवेंद्रराजेंच्या दोन्ही मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. हद्दवाढ व कॉंक्रिटचे रस्ते हे दोन्ही प्रश्न निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मार्गी लागावेत, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी रात्रीच नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत आदेश दिले. हद्दवाढीच्या प्रस्तावाला रात्री उशिरा मंजुरी मिळाली. शिवेंद्रराजे यांनी सोमवारी सकाळी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन कॉंक्रिट रस्त्यांच्या मंजुरीबाबत विचारणा केली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी 50 कोटी निधी देण्याचे मान्य केले असून पुढे कार्यवाही झाली का, असे विचारले असता, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निधी मंजूर केला असून या कामांसाठी प्रस्ताव मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यामुळे हद्दवाढीचा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्नही निकाली निघणार आहे.