सातारा – पोवई नाका परिसरात सुरू असलेल्या ग्रेड सेप्रेटरच्या कामादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेले असून फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीस तब्बल 30 तासांपेक्षा अधिक काळ लागणार आहे. याशिवाय विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दि. 4 व 5 जून रोजीचा सातारा शहर आणि परिसरातील पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सातारा शहराचा काही भाग आणि परिसरातील उपनगरांमध्ये पाणी पुरवठा होत आहे. पोवई नाका परिसरात सुरू ग्रेड सेप्रेटरच्या कामादरम्यान प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी पाणी पुरवठा विस्कळित होत आहे. दि. 4 जून रोजी सकाळी 10 वाजता ग्रेड सेप्रेटर कामांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस ओढ्यामध्ये 450 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 30 तासांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
त्यात वीजपुरवठाही सतत खंडित होत आहे. यामुळे नियमित होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांच्यामार्फत तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आहे. हे काम अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले यांनी दिली. ग्राहकांना दि. 4 आणि 5 जून रोजी सदरबझार, दौलतनगर, करंजे, शाहूपुरी, गोडोली, विसावा, कोडोली, खिंडवाडी, खेड आदी परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. उपलब्ध पाणी काटकसरीने वापर करून प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले.