प्रभात वृत्तसेवा
पुणे : शहरात करोनाच्या साथीचे थैमान सुरू असून दिवसें दिवस स्थिती अतिशय बिकट होत आहे. त्यामुळे घरात एक बाधित सापडला तरी कुटूंबाला रूग्णाच्या उपचारासाठी पैसे जमवाजमव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने पुणेकरांना सवलतीसह मिळकतकर भरण्यास जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच या मागणीचा ठरावही सुतार यांनी स्थायी समितीत दिला आहे.
महापालिकेकडून दरवर्षी 31 मे पूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारणकरात 10 ते 15 टक्के सवलत देण्यात येते. तर मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमध्येही प्रामाणिकपणे करभरणाऱ्या निवासी मिळकतधारकांना या वर्षी मिळकतकरात राज्यशासनाचे कर वगळून सरसकट 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत 31 मे पर्यंत कर भरला तर मिळणार आहे. मात्र, शहरातील सध्याची करोनाची स्थिती पाहता दिवसें दिवस नवे रूग्ण वाढत असून अनेक जण गंभीर होत आहेत. अशा स्थितीत मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या अनेकांवर आता घरातील करोनाबाधितावरील उपचाराचा खर्च येऊन पडला आहे. त्यात, खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी लाखो रूपये मोजावे लागत असून अनेकांचे पुर्ण कुटूंब बाधित असल्याने त्यांना उपचाराची तजवीज करतानाच अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.
अशा स्थितीत त्यांना मिळकतकर भरता न आल्यास सवलतही मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीनं निर्णय घेऊन 31 मे ऐवजी कर सवलतीत कर भरण्यास जुलै 2021 अखेर पर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी सुतार यांनी केली आहे.
घरात करोना रूग्ण असल्याने अनेकांना उपचारासाठी पैशाची जुळवा-जुळव करणे अडचणीचे बनले आहे. त्यात, मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्याने अनेकजण आधीच कर्जबाजारी आहेत.त्यातही ते कर भरण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना पालिकेने मुदतवाढ देणे गरजेचे आहे. त्याबाबतचे पत्र आयुक्तांना देण्यात आले असून तसा ठरावही स्थायी समितीत देण्यात आला आहे.- पृथ्वीराज सुतार ( गटनेता, शिवसेना)