निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी पोलिसांची कारवाई
पिंपरी – भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार राजेश ऊर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (वय 23, रा. सिंहगड सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) याला एक वर्षाकरिता झोपडपट्टी दादा विरोधी कायदा (एमपीडीए) अन्वये अटक करण्यात आली. त्याची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुंड तिवारी यांच्यावर पिस्तूल, रॉड, तलवार, चाकू, कोयता, ही जीवघेणी हत्यारे बाळगणे, दंगा करून खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जाळपोळ करून मालमत्तेचे नुकसान, गंभीर दुखापत, यासारखे गुन्हे केले आहेत. यामुळे पिंपरी चिचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी तिवारी याला एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याला अटक करून येरवडा तुरूंगात त्याची रवानगी केली आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक देवेंद्र चव्हाण, कर्मचारी गवारी, खरात यांच्या पथकाने प्रस्ताव तयार करून सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्याकडे सादर केला. तो त्यांनी उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्फत अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडून पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी या प्रस्तावातील त्रुटी दूर केल्यानंतर या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली.