कोलकाता : बनारस हिंदु विद्यापीठात संस्कृत भाषेच्या शिक्षणासाठी मुस्लिम प्राध्यापकाची नियुक्ती करण्यावरून वाद पेटलेला असतानाच पश्चिम बंगाल मध्ये कोलकाता येथील बेलुरच्या रामकृष्ण मिशन विद्यामंदीर या कॉलेजात मात्र एका मुस्लिम प्राध्यापकाची संस्कृत शिकवण्यासाठी सन्मानाने नियुक्ती करण्यात आली आहे. रमझान अली असे या प्राध्यापकांचे नाव आहे. प्रा रमझान अली यांनी म्हटले आहे की आपली नियुक्ती झाल्यानंतर या कॉलेजातील अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपले ज्या उत्साहात स्वागत केले त्यामुळे आपण भाराऊन गेलो आहोत.
ते म्हणाले की या कॉलेजचे प्राचार्य स्वामी शास्त्रजनंदाजी महाराज यांनी प्रथम आपले स्वागत करून इतराना ओळख करून दिली. प्राचार्य त्यावेळी म्हणाले की माझी धार्मिक ओळख फार महत्वाची नाही. माझी एखाद्या भाषेवर किती कमांड आहे त्याला महत्व आहे. आपले ज्ञान आणि आपली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणे याला अधिक महत्व आहे.
बनारस हिंदु विद्यापीठातून एका मुस्लिम प्राध्यापकाची संस्कृत विभागात करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे जो वाद निर्माण झाला आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की संस्कृतने भारताला सर्वसमावेशकता शिकवली आहे. ही भाषा म्हणजे भारताचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहे. आणि संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. पण एखाद्याला त्याच्या धर्मावरून संस्कृत शिकवण्यास रोखले जाणार असेल तर ते योग्य नाही.
आपल्याला मात्र अशा कोणत्याही भेदभावाच्या वागणुकीचा अनुभव आलेला नाही असे ते म्हणाले. बेलुर कॉलेजच्या व्यवस्थापनाने माझी येथेच राहण्याचीही सोय केली असून मला कोणतीही असुविधा होणार नाही याची काळजी ते घेत आहेत असेही रमझान अली यांनी नमूद केले. 40 वर्षीय ज्ञान अली यांना संस्कृत भाषा शिकवण्याचा नऊ वर्षांचा अनुभव आहे.