प्रकरणावर सरकारने उत्तर देण्याची जया बच्चनकडून मागणी
तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
हैद्राबाद : डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपुर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देशभरातून होत आहे. हैद्राबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर या खळबळजनक घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आज संसदेतही उमटना दिसले. या घटनेनंतर राज्यसभेत खासदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात शिक्षा करा आणि त्यांना शिक्षा म्हणून ठार करा असे जया बच्चन यांनी म्हटले आहे. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावे असेही म्हटले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ‘अनेक कायदे तयार केले आहेत. मात्र अनेकदा कायदे तयार करून समस्या सोडवल्या जात नाहीत. ही समस्या मूळापासून नष्ट करण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे’ असे देखील गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.