नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले. बऱ्याच काळापर्यंत संरक्षणाशी संबंधित कामकाज हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उभारण्यात आलेल्या झोपडीसारख्या ठिकाणाहून करण्यात येत होते.
घोड्यांचे तबेले आणि बराकी लक्षात घेऊन ते बांधण्यात आले होते. नवे संरक्षण कार्यालय संकुल, आपल्या संरक्षण दलांचे कामकाज सुलभ आणि प्रभावी करण्याचे प्रयत्न अधिक बळकट करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केजी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू इथे बांधण्यात आलेली आधुनिक कार्यालये, देशाच्या सुरक्षेसंदर्भातले कामकाज प्रभावीपणे सुरू राखण्यासाठी दीर्घकाळ उपयोगी ठरतील, असे ते म्हणाले.
कोणत्याही देशाची राजधानी म्हणजे त्या देशाची विचारधारा, निर्धार, सामर्थ्य आणि संस्कृती यांचे प्रतिक असते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. म्हणूनच भारताची राजधानी अशी असली पाहिजे जिथे नागरिक, लोक केंद्रस्थानी आहेत. नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनामध्ये आधुनिक पायाभूत सुविधांच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. हाच विचार घेऊन सेन्ट्रल विस्टाचे बांधकाम सुरु असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
संरक्षण कार्यालय संकुलाचे काम 24 महिन्यात पूर्ण होणार होते मात्र केवळ 12 महिन्यांच्या विक्रमी वेळेत ते पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मजुरांसह इतर अनेक आव्हाने समोर असतानाही हे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. हे संरक्षण कार्यालय संकुल म्हणजे सरकारची बदललेली कार्य पद्धती आणि प्राधान्य यांचे द्योतक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
सरकाच्या विविध विभागांकडे उपलब्ध जमिनीचा पुरेपूर आणि योग्य उपयोग ही एक प्राधान्याची बाब आहे. हे स्पष्ट करताना, हे संरक्षण कार्यालय संकुल 13 एकर जमिनीवर साकारले आहे. आधीच्या काळात यासाठी पाचपट जागेचा वापर झाला असता. सामायिक मध्यवर्ती सचिवालय, कॉन्फरन्स सभागृह, मेट्रोशी सहज कनेक्टीव्हिटी यामुळे राजधानी जन स्नेही होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.