जुन्नर – पुणे जिल्ह्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडज (ता. जुन्नर) येथील खंडेरायाच्या दर्शनासाठी आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसची थेट सुविधा सुरू झाल्याची माहिती कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे महाव्यवस्थापक राजेंद्र चव्हाण यांनी दिली. श्रीक्षेत्र वडज तीन गाड्या मुक्कामी थांबण्यास सुरुवात झाली असून भाविक-भक्त, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिली.
सोलापूर विभागातील या तिन्ही बसेस दररोज सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत या वडज येथे येत असून सकाळी सातपर्यंत पुन्हा जुन्नरला जाणार आहेत. या लालपरीच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे. या मुक्कामी बसमुळे परिसरातील पारुंडे, चिंचोली, निमदरी आणि गावकऱ्यांची सोय होणार आहे.
यावेळी वडज ग्रामस्थांनी या नव्याने सुरू झालेल्या गाड्यांमधील कर्मचाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार केला. यावेळी अध्यक्ष विजय चव्हाण, ऍड. उल्हास चव्हाण, हरीश चव्हाण, महाव्यवस्थापक राजेंद्र चव्हाण, तुषार साळुंखे, सुनील चव्हाण, गजानन चव्हाण, नवनाथ महाराज साळुंखे, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते.