सासवड – सटलवाडी (ता. पुरंदर) येथे शेतजमिनीच्या बांधावरून असलेल्या जुन्या वादातून आई व मुलाला दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अमित विनायक यादव, विनायक चंद्रकांत यादव (दोघे रा. सटलवाडी, ता. पुरंदर) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आशा यादव यांनी फिर्याद दिली आहे. सासवड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार आशा अंकुश यादव, संदीप अंकुश यादव आणि आरोपी अमित विनायक यादव, विनायक चंद्रकांत यादव यांच्यात जमिनीच्या बांधावरून वाद सुरू होता.
फिर्यादी आशा यादव हे सरपण आणण्याकरिता शेताकडे जात असताना आरोपींनी त्यांना थांबविले आणि दोघांनी आशा यादव यांना मारहाण केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा संदीप यादव तिथे आला आणि त्याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमित यादव याने दगड हातात धरून संदीप यांच्या कपाळावर मारला. त्यामुळे संदीप याला कपाळावर दुखापत झाली आहे.