नागरिकत्व विधेयकाचा विरोध करणार
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने अचानक घुमजाव केल्याने भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, राज्यसभेत विरोधात मतदान करणार असल्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.
लोकसभेने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या बुधवारी राज्यसभेत सादर केले जाणार आहे. अशात, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या हृदयाचे ठोके वाढविणारा निर्णय घेतला आहे. राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसते, असे ट्वीट सेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
राज्यसभेत सेनेचे तीन सदस्य आहेत. शिवसेनेने राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात मतदान केले तर सरकारच्या गणिताचे 3-13 होवू शकते. राज्यसभेत रालोआचे 119 सदस्य आहेत तर संपुआचे 100 खासदार आहेत. लोकसभेत भाजपचे 303 खासदार आहेत. यामुळे सरकारला काळजी नव्हती. मात्र, राज्यसभेत सरकारचे बहुमत काठावर आहे. अशात कोणत्याही क्षणी सरकारचा खेळ बिघडू शकतो.
कॉंग्रेसने या विधेयकाच्या विरोधात आक्रामक भूमिका घेतली आहे. तर, जेडीयू आणि बीजेडीमुळे सरकार निश्चिंत दिसत आहे.