मनसे छेडणार गांधीगिरी आंदोलन : परवान्यांचा गैरवापर
शिरुर- शिरुर शहर बसस्थानकातील फिरते विक्रेते (हॉकर्स) यांचा परवाना ज्या मूळ मालकांच्या नावावर आहे. त्यांनीच तो चालवावा. परप्रांतीय विक्रेते यांचा झालेला सुळसुळाट आगारप्रमुख यांनी तत्काळ रोखावा, अशी मागणी मनसेचे शिरुर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केली. मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले की, शिरुर शहरात परप्रांतीयांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्याकडून यापूर्वी किरकोळ गुन्हे घडले आहेत. मोठा गुन्हा घडल्यास कोण जबाबदार राहणार, असा सवाल घोगरे यांनी केला. ते म्हणाले की, शिरुर शहरात दररोज हजारो बसगाड्यांची ये – जा होत असते.
बसस्थानकात परप्रांतीय फिरते विक्रेते (हॉकर्स) काम करीत आहेत. विक्रेते यांच्याकडे कोणताही अधिकृत स्वत:चा परवाना नाही. त्यांचा बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासुन सुळसुळाट झाला आहे. ते प्रवाशांना अतिरिक्त दरानेही खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. ज्यांच्याकडे फिरते विक्रेते (हॉकर्स) परवाना आहे. ते मूळ मालक यांनी हे परवाने परस्पर परप्रांतीयांना विक्रीसाठी दिले असल्याचे निदर्शनास आले आहेत. ज्यांच्याकडे हे परवाने आहेत. त्यांनीच स्वत: खाद्यपदार्थांची विक्री करावी, त्याचा स्वत: वापर करावा; अन्यथा आगारप्रमुखांनी तात्काळ अनधिकृत विक्रेत्यांची दखल घेऊन त्याचे परवाने कायमचेच रद्द करावेत. तसेच होतकरु, गरजूंनाच परवाने द्यावे, बचतगटांनाही सामील करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात शिरुर बसस्थानकाचे आगारप्रमुख महेंद्र माघाडे यांना मनसेच्या वतीने निवेदन दिले. यावेळी मागण्यांची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी; अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन न करता गांधीगिरीने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे, मनसेचे वाहतूक सेनेचे रवींद्र गुळादे, मनसेचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.