लोखंडी शिडी तुटल्याने भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची गैरसोय
मंचर- खांडस, बेलाचीवाडी, काठेवाडी, कर्जत व मुंबईकडून भीमाशंकरला दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांना शिडी घाट तुटल्याने रस्ता बंद झाला आहे. प्रशासनाने हा मार्ग दुरुस्त करावा, अशी मागणी शिवभक्त आणि टेकर्स यांनी केली आहे. शिडी घाटातील रस्ता शिड्या तुटल्याने अधिकच धोकादायक बनला आहे, त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी जीव धोक्यात घालून शिडी घाटातील रस्त्याचा अवलंब करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निसर्ग सौंदर्य, खळखळ आवाज करीत वाहणारे धबधबे तसेच श्रावण महिना सुरू झाल्याने ज्योर्तिलिंगाचे दर्शनघेण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. काही भाविक आणि ट्रेकिंग करणारे पर्यटक टेकिंग करीत कर्जत तालुक्यातील खांडस गावातून असलेल्या जवळच्या पायवाटेने शिडी घाटातून भीमाशंकरला दर्शनासाठी येतात. या पायवाटेतील महत्त्वाची पायवाट म्हणजे शिडी घाट होय.
या मार्गावर लोखंडी शिड्या लावण्यात आल्या आहेत. सध्या सह्याद्री पर्वत रांगेतील भीमाशंकर येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. श्रावण महिन्यात दर्शनासाठी असंख्य शिवभक्त व टेकर्स या मार्गाने ये-जा करत असतात. लोखंडी शिड्या तुटल्याने घाटातील रस्ता धोकादायक बनला आहे, अशी माहिती भीमाशंकर येथील रहिवासी उमेश लोहकरे, प्रदीप कुऱ्हाडे, रामदास कुऱ्हाडे यांनी दिली. श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने दगड, माती आणि खडक कोसळल्याने शिडी घाटातील लोखंडी शिड्या तुटल्याने पायी रस्ता बंद झाला असल्याने खांडस, बेलाचीवाडी, काठेवाडी, कर्जत व मुंबईकडून भीमाशंकरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे.