शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा : गावगुंडामुळे संपूर्ण गाव वैतागले
निमोणे- शिंदोडी (ता. शिरुर) येथील एमआयडीसीमधील पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी पांडुरंग फडके यांना गावातील संजय उमाजी शितोळे याने दारुच्या नशेत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय शितोळे हा जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलत शितोळे यांचा भाऊ आहे.
पांडुरंग फडके हे शिंदोडी येथील च्या पाणी पुरवठा विभागात काम करतात. बुधवार (दि 31) रोजी रात्री 8 च्या सुमारास संजय शितोळे हा दारूच्या नशेत गेटजवळ आला. तेथे कर्मचारी फडके यांना गेट उघड, आमची रात्री उशिरा मासे न्यायला गाडी येणार आहे, असे सांगितले. त्यावेळी फडके यांनी तुमची गाडी आली की लगेच गेट उघडतो.अधिकाऱ्यांनी गेट बंद ठेवायला सांगितलं आहे, असे शितोळे याला सांगितले. त्यानंतर शितोळे याने फडके यांना शिवीगाळ करत दगडाने गेटचे कुलुप तोडले. फडके यांना मारहाण केली. माझा भाऊ दौलत शितोळे कोण आहे, तुम्हाला माहीत नाही का? असे म्हणून जर तुम्ही पोलीस तक्रार केली तर तुला बघुन घेईन, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
संजय शितोळे हा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि शिंदोडीचे उपसरपंच दौलत शितोळे भाऊ आहे. त्याने गावात अनेकवेळा दारू पिऊन लोकांना मारहाण केली आहे. परंतु त्यांच्या दहशतीमुळे कोणीच आत्तापर्यंत पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे संजय शितोळे आणि त्यांचे नातेवाईक दौलत शितोळे याच्या नावाखाली गावात विनाकारण त्रास देत आहेत. संजय शितोळे याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात 323, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. संजय शितोळे याच्यापासून माझ्या सर्व कुटुंबीयांना धोका आहे. आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, असे निवेदन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देणार असल्याचे पत्रकार तेजस फडके यांनी सांगितले.