सातारा, दि. 3 (प्रतिनिधी)
येथील शाहूपुरीमध्ये सोमवार पेठेत घराच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने सुमारे आडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीत सुमारे सव्वा लाखांचा ऐवज गेला असून, शाहूपुरी पोलिसांनी अजय दत्तात्रय जाधव (रा. सोमवार पेठ,सातारा) यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार जाधव यांच्या सासुबाई साधना कारंजकर (रा. सोमवार पेठ,शाहूपुरी) यांनी त्यांच्याच घरात खुर्चीवर सोन्याचे दागिने असलेली पर्स ठेवली होती. त्यानंतर दि. 30 रोजी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास झोपी गेल्या होत्या.
सकाळी उठल्यानंतर साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यामध्ये अडीच तोळे वजनाचा सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा बकुळाहार होता. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.
दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण चिंताजनक तर आहेच पण त्या चोऱ्यांचा तपास होत नसल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कारभाराबद्दल नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी दोन दिवसापुर्वी आवाहन केल्याने कोणतीही चोरीची घटना घडली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्यांनाही आवाहन करून जनतेला सहकार्य करण्याची मागणी नागरिक करत आहेत.