जुन्नर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याबद्दल जुन्नर पोलिसांकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदविली आहे. तालुक्यातील दोन ग्रुपवर शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी ही वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. संबंधित पोस्ट करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.
अमेरिकन असोशिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन आयोजित एका चॅरीटी शोमध्ये अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला होता. हृदयविकार, ल्युकेमिया यांसारख्या आजार असलेल्या भारतातील रुग्णांच्या मदतीसाठी हा शो आयोजित करण्यात आला होता. या अगोदरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या असून यापुढे चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांवर कारवाहीची मागणी भाजपाचे जुन्नर शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केली आहे. यावेळी निलेश गायकवाड, अमोल कोल्हाळ व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे करीत आहेत.