नवी दिल्ली – केरळमधील विमान दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी 56 प्रवाशांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. आणखी 93 जणांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत.
दुबईहून आलेले विमान शुक्रवारी रात्री केरळच्या कोझिकोडे विमानतळावरील धावपट्टीवरून घसरून लगतच्या दरीत कोसळले. त्या दुर्घटनेत 18 जण मृत्युमुखी पडले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या त्या दुर्घटनाग्रस्त विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 190 जण होते.
जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील 56 जणांना पूर्ण तंदुरूस्त झाल्याने रुग्णालयांमधून सोडण्यात आल्याची माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसकडून देण्यात आली. त्या एक्स्प्रेसची मालकी एअर इंडिया या सरकारी कंपनीकडे आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 16 प्रवाशांचे मृतदेह रविवारीच त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले.