कोल्हापूर/प्रतिनिधी- कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे.
या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. प्रसार माध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला आणि शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायती काम करावे, असे आवाहन करत शासन निर्णय जारी केला