एनसीईआरटीची शाळांना मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : सकारात्मक आणि आनंददायक वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांमधील दुपारच्या जेवणाच्या सुटीत विद्यार्थ्यांना वयायोग्य गाणी ऐकवली जावीत, अशी सूचना “एनसीईआरटी’ने शाळांना केली आहे. “आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग’साठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये “नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी)ने ही सूचना केली आहे.
संशोधनात असे दिसून आले आहे की संगीतामुळे मुलांमध्ये ग्रहणक्षमतेची वाढ होते. सौम्य आणि शांततेची भावना विकसित करण्यास देखील संगीत मदत करते. मुलांना दुपारचे जेवण दिले जात असताना, किंवा मुले डबा खात असतानाच्या वेळात वयोगट अनुरुप संगीत वाजवले जाऊ शकते. एक सकारात्मक आणि आनंददायक वातावरण तयार करण्यासाठी शाळा या वेळेचा उपयोग करू शकतात, असे “एनसीईआरटी’ने म्हटले आहे.
जामिया मिलिया इस्लामिया यांच्या सहकार्याने शिक्षकांच्या पथकाने महानगरपालिकेच्या 34 शाळांमध्ये वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या आधारे ही मार्गदर्शकतत्त्वे तयार केली आहेत. “एनसीईआरटी’ने पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर कला-अध्यापनासाठी क्षमतावृद्धी, उपक्रमांचे नियोजन, वेळेचे आणि स्रोतांचे नियोजन, वर्ग व्यवस्थापन आणि समुदायातील सहभागाच्या मुद्दयांवर तपशीलवार मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
तपासणी होण्याच्या भीतीविना मुले करू शकतील, असा “कला शिक्षण’ हा भीती न वाटणारा उपक्रम असायला हवा, असे “एनसीईआरटी’ने शाळांना सांगितले आहे.