पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मागील वर्षी जाहीर करण्यात आलेली महाविद्यालयीन शुल्कवाढ रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत जनतादल (सेक्यूलर) विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आले आहे. ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने मार्च 2020 मध्ये कुलगुरूंकडे पत्राद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, या निर्णयामुळे नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, या शुल्कवाढी सोबतच ज्या विद्यार्थ्यांची करोनामुळे परिक्षा होऊ शकली नाही, त्यांची परिक्षा फी परत मिळावी अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही संघटनेने केली असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांनी सांगितले.