पिंपरी – भरधाव वेगातील एसटीच्या शिवनेरी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकड ब्रिजजवळ एका हॉस्पिटलसमोर घडली.
अश्विनी तानाजी मुरुडकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तानाजी पोपटराव मुरुडकर (वय 28, रा. भोसरी) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक रवींद्र विठ्ठल जाधव (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी फिर्यादी तानाजी आणि त्यांच्या मयत पत्नी अश्विनी हे दोघेजण (एमएच-12-ईडी-2849) या दुचाकीवरून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात होते. ते वाकड ब्रिजजवळ आले असता त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या एसटीच्या शिवनेरी बसने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तानाजी हे गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पत्नी अश्विनी यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.